ऑलमोस्ट फेमस दुकानात चोरी करून पसार झालेल्या आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ ने ठोकळ्या बेड्या…..
ऑलमोस्ट फेमस दुकानात चोरी करून पसार झालेल्या आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ ने ठोकळ्या बेड्या…..
पनवेल(विशेष प्रतिनिधी): कामोठे पोलीस ठाणे हद्दीमध्ये सेक्टर 19, कामोठे येथील ऑलमोस्ट फेमस या दुकानाचे शटर उचकटून एक लिनोवा कंपनीचा लॅपटॉप व 6,000/- रोख रक्कम चोरीस गेल्याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पाहून खात्री केली असता, सदर गुन्हा मिथुन मोजलीस सिकदर याने केला असल्याचे निष्पन्न झाले होते. सदर आरोपी हा फिरस्ता असल्याने तसेच तो मोबाइल सारखे कोणतेही संपर्काचे साधन वापरत नसल्याने त्याचा निश्चित ठावठिकाणा मिळून येत नव्हता.
या आरोपीचा शोध सुरु असताना तो खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात चोरीचा लॅपटॉप विक्री करण्यासाठी आला असल्याबाबत गोपनीय बातमी प्राप्त झाली होती. मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून मिथुन मोजलीस सिकदर(वय 26 वर्ष,रा.कातकरवाडी कळंबोली) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीकडून एकूण 57,550/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीहा सराईत गुन्हेगार असून कामोठे, तळोजा, कळंबोली खांदेश्वर खारघर या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.