वाकळघर ग्रामस्थांच्या सेवेसाठी सदा शेलारांच्या मायेचा निवारा……. 

ROHA TIMES

वाकळघर ग्रामस्थांच्या सेवेसाठी सदा शेलारांच्या मायेचा निवारा…….

बोर्लीपंचतन(मकरंद जाधव) श्रीवर्धन तालुक्याच्या वाकळघर गावातील राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त(चालक)कर्मचारी सदानंद बाळाजी शेलार यांनी एस.टी.ची वाट पहाणार्‍या अबालवृद्धांसाठी आपल्या आई वडीलांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने वाकळघर गावाजवळ निवारा थांबा उभारुन समाजात एक वेगळा आदर्श उभा केला.श्रीवर्धन दिघी मार्गावर वाकळघर गावाजवळच्या नदीवर काही वर्षापुर्वी छोटा पुल झाल्याने गावकऱ्यांना मुख्य रस्त्यावर जवळचा एस.टी.चा विनंती थांबा निर्माण झाला. या थांब्याच्या मंजूरीसाठी सदानंद शेलार यांनीच प्रयत्न केले होते.मात्र या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी निवारा नव्हता.ही समस्या सदानंद शेलार यांना अस्वस्थ करीत होती.त्यामुळे निवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या ग्रामस्थांच्या सोईसाठी सन २०१९ मध्ये स्वखर्चाने निवारा थांबा उभारला होता.मात्र नदीपात्रातल्या पाण्याच्या माऱ्याने आणि वादळामधे त्याची मोडतोड झाल्याने प्रवाशांच्या डोक्यावरच्या उध्वस्त झालेल्या निवाऱ्यासारखीच सदानंद शेलार यांच्या मनाचीसुद्धा अवस्था झाली होती. कामानिमित्त येता जाताना उध्वस्त झालेल्या निवारा थांब्याकडे पहाताना त्यांच्या डोळ्यासमोर उन्हातान्हात बसुन एस.टी.च्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या अबालवृद्धांचे चेहरे दिसू लागले.या घटनेने काहीसे अस्वस्थ झालेल्या शेलारांनी पुन्हा नव्या जोमाने निवारा थांबा उभारण्याचा निर्धार केला.आणि काही दिवसातच प्रवाशांच्या सेवेसाठी हे एस.टी.चं ब्रीद शेलार यांनी एक टुमदार निवारा थांबा व बैठक व्यवस्था स्वखर्चाने पुन्हा उभारुन प्रत्यक्षात उतरवलं.प्रत्येक समस्या सरकार किंवा लोकप्रतिनिधींनी सोडवावी असं नाही.त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून मी हे समाजकार्य केलं असून उनपावसात गाडीची वाट पहात अबालवृध्द आणि विद्यार्थी यांना पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी निवारा शेड व बैठक व्यवस्था उभारण्याचं माझं काम जरी छोटं असलं तरी ग्रामस्थांचे होणारे हाल थांबणार आहेत.त्यामुळे त्यातून मिळणारं समाधान मात्र माझ्यासाठी मोठं असल्याची भावना सदानंद शेलार यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.या कामात त्यांची पत्नी संजीवनी शेलार यांची साथ तेवढीच मोलाची होती.आज उठसूट सार्वजनिकतेच्या नावावर कुणालाही न विचारता लोकांना वेठीस धरुन बारा महीने कुठली ना कुठली कारणं पुढे करुन पावत्या फाडणाऱ्यांचा वावर सर्वत्र दिसत असताना वाकळघरच्या सदानंद शेलार यांनी स्वखर्चाने उभारलेल्या  निवारा थांब्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close