श्री सिद्धिविनायकाच्या माघी उत्सवानिमित्त आज नांदगावमध्ये यात्रा……
श्री सिद्धिविनायकाच्या माघी उत्सवानिमित्त आज नांदगावमध्ये यात्रा……
कोर्लई(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील नांदगावच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक देवस्थानच्या माघी उत्सवानिमित्त आज नांदगावमध्ये प्रतीवर्षाप्रमाणे मोठी जत्रा भरणार आहे.
माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघी उत्सवाला कीर्तनाने प्रारंभ झाला असून तो पंचमी पर्यंत चालणार आहे. चिटणीस -गुप्ते कौटुंबिक ट्रस्टच्या वतीने आणलेल्या श्रींच्या बालमूर्तीची यजमानांकडून षोडशोपचारे पूजन करून पुण्याहवाचन केले गेले असून आज बुधवारी पहाटे एक वाजता यजमानांतर्फे पूजा होऊन ब्राह्मणांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर पहाटे तीन वाजता मंदिर श्रींच्या दर्शनासाठी भक्तगणांना डी खुले केले जाणार आहे.त्यानंतर सकाळी अकरा वाजता मंदिराच्या सभामंडपात श्री गणेश जन्माचे कीर्तन व १२ . ४० वा.गणेश जन्म केला जाणार आहे.त्यानंतर महिला पाळणा गीत सादर करून नंतर आरती होऊन उपस्थितांना बाळगणेशाचे दर्शन दिले जाणार आहे.सायंकाळी सात वाजता पालखी सोहळा होणार आहे.
या दरम्यान दिवसभरात मंदिर परिसरात यात्रा भरणार आहे.पंचमीच्या दिवशी पहाटे चार वाजता भजन व काकड आरती व त्या नंतर श्रींचे शोडषोपचारे पूजन करून वस्त्र व हार अर्पण करून प्रसादाचा नैवेद्य अर्पण करून दुपारी भक्तांनाही महाप्रसादाचा लाभ देण्यात येणार आहे.
या वर्षी चिटणीस -गुप्ते कौटुंबिक ट्रस्टने मंदिराच्या पटांगणात भरणारी जत्रा रद्द करण्याचे ठरवले होते परंतु नांदगाव ग्रामस्थ व भक्तगणांनी त्यास तीव्र विरोध केल्याने सदर यात्रा पूर्ववत भरविण्याचे ठरविल्याने भक्तगणातील असंतोष तुर्तास मावळला आहे.