
शेतकऱ्यांनी रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा : मनिषा भुजबळ……

शेतकऱ्यांनी रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा : मनिषा भुजबळ…… 
कोर्लई(राजीव नेवासेकर) महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रायगड यांच्या वतीने दि.९ ते दि.१३ फेब्रुवारी या कालावधीत पनवेल-कामोठे येथील सेक्टर २७ मधे रायगड जिल्हा कृषी महोत्सव -२०२३ चे आयोजन करण्यात आले असून नागरीक व शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देऊन जिल्हा कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुरुड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना/ उपक्रमाची माहिती, कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय, इत्यादी बाबतचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे. कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची भेट घडावी व सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करून घेता यावे व उत्पादन ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य व खाद्य महोत्सव फळे-फुले व भाजीपाला महोत्सव इत्यादीचे आयोजन करण्यासाठी रायगड जिल्ह्यात दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे यंदा रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सदरच्या कृषी महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

शेतक-यांना या जिल्हा कृषी महोत्सवात १. कृषि विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे. २. शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण. ३. समूह गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे. ४. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री. ५. कृषी विषयक परिसंवाद / व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाण – घेवाणद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे. ६. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी करावयाचे उपाय योजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे याबरोबरच 1. भव्य कृषि उत्पादने महोत्सव 2. भाजीपाला विक्री दालने, सेंद्रिय शेतकरी गटाचे विक्री दालने. 2. शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण विषयांचे परिसंवाद व चर्चासत्रे. 3. कृषी विभाग व संलग्न विभागाच्या योजनांची सादरीकरण इ. गोष्टीचा समावेश ध्येय उद्दिष्ट आहे. तरी कृषी महोत्सवाला नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले आहे.