
माणगांव धनसे मैदानावर १४ वर्षाखालील खेळाडुंच्या सिझन क्रिकेटचा रंगतदार सामना…….

माणगांव धनसे मैदानावर १४ वर्षाखालील खेळाडुंच्या सिझन क्रिकेटचा रंगतदार सामना……. 
उतेखोल/माणगांव( रविंद्र कुवेसकर )एन एस क्रिकेट ॲकॅडेमी माणगांव आणि तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल ॲकॅडेमीच्या डि वाय पाटील मुंबई
संघात शनिवार दि.४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०९.३० वाजता माणगांवच्या धनसे मैदानावर झालेल्या क्रिकेट लढतीत, एन एस क्रिकेट ॲकॅडेमी माणगांव संघाने ४४ धावांनी सामना जिंकला. टीएमजीए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. तर प्रथम फलंदाजी करताना नयन शिंदे क्रिकेट ॲकॅडमी संघाच्या कुणाल यादवच्या उत्कृष्ट १०६ धावांच्या पहिल्याच शतकी खेळी व आयुष उजगरेने केलेल्या ७१ धावांच्या जोरावर त्यांच्या संघाने २५७ धावा केल्या.
विजयासाठीचे लक्ष गाठताना मुंबईचे प्रशिक्षक साई मेढेकर यांच्या मुख्य मार्गदर्शनात तयार झालेल्या टीएमजीए डिवायपाटील मुंबई संघाने कडवी झुंज दिली. मात्र एनएससीए माणगांव संघाच्या गोलंदाजांसमोर त्यांना विजय मिळवता आला नाही. फिरकी, वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्या समोर टीएमजीए डिवाय पाटील मुंबई संघाच्या अद्वैत कचराजने लढाऊ ५५ धावा काढल्या आणि तो सामनावीर ठरला. मात्र त्याच्या संघाला २११ धावांपर्यंतच मजल मारता आली.
१४ वर्षाखालील खेळाडूंच्या दोन संघातील ४० षटकांचे सिझन क्रिकेट युध्द रंगतदार ठरले. सामन्याचे उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षक साई मेढेकर व नयन शिंदे तसेच रायगड भूषण जेष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर व मुंबई येथुन सामना पाहण्यासाठी आलेले पालक उपस्थित होते. यावेळी सर्व खेळाडुंनी व उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. शिस्तबद्ध उत्साही खेळाडूंनी खुप चांगला खेळ केला. उत्तम सराव व प्रशिक्षणांतुनच बहारदार खेळी करणाऱ्या आपल्या ग्रामीण भागातील मुल व मुलिंना लहानवयातच अशा प्रकारे क्रिकेट खेळाचे उत्तम प्लॅटफॉर्म व संधी उपलब्ध करुन देणाऱ्या आयोजकांचे कौतुक करावे तेवढे थोडे अशा भावना खेळाडूंच्या पालकांनी व्यक्त केल्या आहेत.