
पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक वारकरीसंख्या असल्याचा सार्थ अभिमान;आ.गोगावले यांच्याहस्ते ज्येष्ठ वारकऱ्यांना टाळवाटप;15 दिवसांत आमदाराचे मंत्री होण्याचा केला पुनरूच्चार…….

पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक वारकरीसंख्या असल्याचा सार्थ अभिमान;आ.गोगावले यांच्याहस्ते ज्येष्ठ वारकऱ्यांना टाळवाटप;15 दिवसांत आमदाराचे मंत्री होण्याचा केला पुनरूच्चार…….
पोलादपूर (शैलेश पालकर)- रायगड जिल्ह्यात वारकरी सांप्रदायांची संख्या अधिक असली तरी पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक वारकरी संख्या असल्याचा सार्थ अभिमान असून आपण स्वत: वारकरी नसताना एकही वारी चुकवली नाही म्हणूनच येथील वारकरी लोकांनी आपणास तिसऱ्यांदा निवडून दिले
आणि चौथ्यावेळीही आपणच आमदार होणार आहोत. कारण माझ्यासोबत व्यासपिठावर असलेल्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून यायचे आहे. गेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्यासाठी मंत्रीपदाचा आग्रह सोडून दिला असला तरी येत्या 15 दिवसांमध्ये आमदाराचा मंत्री होऊन येईन, असा पुनरूच्चार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विधीमंडळातील प्रतोद आ.भरत गोगावले यांनी श्रीक्षेत्र पळचिल येथे केला.
श्रीक्षेत्र पळचिल येथे अखंड कोकणातील पारमार्थिक भाग्यविधाते श्रीसंत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळा, हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयामध्ये ज्येष्ठ वारकऱ्यांचा आ.गोगावले यांच्याहस्ते टाळजोडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दर्पण पुरस्कार विजेते ग्रामीण पत्रकार शैलेश पालकर यांनाही मोरेमाऊली सांप्रदायातर्फे गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सदगुरू आनंददादा महाराज मोरे माऊली, माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, सांप्रदायाचे ग्रामीण अध्यक्ष अनंत पार्टे, समाजसेवक अविनाश जाधव, रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, समाजसेवक रघुनाथ जाधव, माजी सभापती महादेव निविलकर, माजी उपसभापती सहदेव जाधव, सांप्रदायाचे सचिव लक्ष्मण मोरे, दशरथ उतेकर, अनिल दळवी, बाळकृष्ण उतेकर, नारायण साने, पापाजी जगदीश सिंग तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
आ.गोगावले यांनी पुढे बोलताना, पोलादपूर तालुका हा वारकरी सांप्रदाय लाभलेला तालुका असून येथे परमपूज्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय, आजरेकर महाराज सांप्रदाय, भावे महाराज सांप्रदाय, अरविंदनाथ महाराज सांप्रदाय अशा सांप्रदायातील संतमात्म्यांच्या धार्मिक कार्यातून समाज प्रबोधनातून जनजागृती करत वारकरी
सांप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली, म्हणूनच वारकरीबहुल तालुका म्हणून पोलादपूरची ओळख निर्माण झाली आहे. परमपूज्य संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांनी भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष पद भूषविले होते, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असून याचा सार्थ अभिमानही आपणास आहे, असे सांगितले. राजधानी मुंबईत स्वर्गीय हिंदूहृदय स्र्राट बाळासाहेबांच्या नावाने 100 दवाखाने गरिबांसाठी सुरू करण्याचा मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्या 9 फेब्रुवारीला होणाऱ्या वाढदिवशी शासनाचा मानस असल्याची सांगून राज्यातील गोरगरीब जनतेला याचा निश्चित लाभ होणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मनोगतात,पंढरपूरला श्रीविठ्ठल बडव्यांच्या ताब्यात अडकल्यानंतर मंत्रालयावर पहिला लाखो वारकऱ्यांचा मोर्चा नेण्यात आला. त्याचे नेतृत्व मोरेमाऊली सांप्रदायाने केले होते, याची आठवण करून देत वै.परमपूज्य सदगुरू श्रीपतीबाबा मोरे, श्रीसंत ज्ञानेश्वर मोरे माऊली परिवाराने धार्मिक कार्यातून केवळ तालुक्याची नव्हे तर महाराष्ट्राची अखंड सेवा केली.
मुंबईसारख्या शहरी भागात हा कार्यक्रम घेण्यापेक्षा श्रीक्षेत्र पळचिल येथेच माऊलींच्या जन्मभूमीत हा कार्यक्रम व्हावा यावर सांप्रदायाचे एकमत झाल्याचे समाधान व्यक्त करून सांप्रदायाचे अनुयायी मुंबई, पुणे, पंढरपूर, आळंदीसह गुजरात व पंजाब राज्यातून आले असल्याने माऊलीचा संप्रदाय किती मोठा आहे, याची व्याप्ती आणि प्रचिती लक्षात येते.
गेल्या शंभर दीडशे दोनशे वर्षांपूर्वी पोलादपूर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात रस्ते नसतानाही पायी प्रवास करून वै.प.पू. श्रीपती बाबा मोरे, परमपूज्य सदगुरू संत ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांनी आध्यात्मातून समाज प्रबोधन आणि जनजागृती निर्माण करून सर्वांना भक्ती मार्गात आणण्याची काम केल्यामुळेच आज प्रत्येक गावात पारायण, हरिनाम सप्ताह ही संकल्पना रुजली असल्याचे सांगितले.
रात्री परमपूज्य सदगुरू दादामहाराज मोरे माऊली यांचे हरिकिर्तन हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाले. गुरूवारी सकाळी कोतवालचे रामचंद्र महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तन होऊन या अखंड हरिनाम सोहळयाची सांगता झाली. 26 जानेवारीपासून 2 फेबु्रवारी 2023 पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा परमपूज्य सदगुरू दादामहाराज मोरे माऊली यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांप्रदायाची सचिव लक्ष्मण मोरे यांनी केले.