
दहिवली येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा; श्रीराम जय राम जय जय राम च्या घोषणांनी दुमदुमला परिसर; श्रीराम भक्तांची दाटली येथे मांदियाळी……

दहिवली येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा; श्रीराम जय राम जय जय राम च्या घोषणांनी दुमदुमला परिसर; श्रीराम भक्तांची दाटली येथे मांदियाळी…… 
नरेश जाधव / रायगड कर्जत:
दहिवली येथील घुमरे कुटुंबीयांतर्फे सन १९२० सालापासून श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा श्रीराम कृपेने अखंडपणे सुरू आहे. श्रीराम जन्मोत्सवास कै. नरहरी (बंधु) घुमरे यांचा मोलाचा वाटा होता. सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीराम पंचायतन पंचक्रोशी दैवज्ञ समाज ट्रस्ट तर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटे ५.३० वाजता श्रीराम काकड आरती, ८.३० वाजता महापुजा अभिषेक, सकाळी १०.१५ वाजता श्रीराम जप तर दुपारी १२.२६ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा, पाळणा, किर्तन, स्तोत्र, रामरक्षा, महाआरती करण्यात आली. तसेच सायंकाळी ५ वाजता भजन, ७ वाजता महाआरती, रामरक्षा, रामपाठ तर रात्री ९ वाजता श्रीरामांची पालखीतुन मिरवणुक काढुन तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
हभप मोरेश्वर नरहरी घुमरे यांनी सुश्राव्य असे किर्तन साजरे करुन वातावरण श्रीराममय केल्याने आलेले प्रभु श्रीरामाचे भाविक भक्त तल्लीन झाले होते. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी परिसरातील आबालवृद्धांसह शेकडो महिला, तरुण, तरुणी तसेच श्रीराम पंचायतन पंचक्रोशी दैवज्ञ समाज ट्रस्टचे अशोक घुमरे, संजय घुमरे, भालचंद्र घुमरे, जितेंद्र घुमरे, मोरेश्वर घुमरे, बळवंत घुमरे, विलास दांडेकर, मनोहर दांडेकर, मोहन पोतदार, श्रीमती शुभलक्ष्मी पितळे, सौ. अश्विनी घुमरे, श्रीमती संगीता मुरकुटे, विवेक (मनु) दांडेकर, गणेश गीध, सुधीर पोतदार, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.