पोलादपूर नगरपंचायत प्रभाग रचना बदलणार नसल्याने विरोधकांची होणार दमछाक सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची नाराजी दूर केल्यास ‘शंभर टक्के शिवसेना’

[avatar]
पोलादपूर नगरपंचायत प्रभाग रचना बदलणार नसल्याने विरोधकांची होणार दमछाक
सत्ताधाऱ्यांनी नागरिकांची नाराजी दूर केल्यास ‘शंभर टक्के शिवसेना’
पोलादपूर (शैलेश पालकर)– पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवेळीदेखील 2011ची जनगणना गृहित धरून प्रभाग रचना कायम राहणार असल्याने सत्ताधारी शिवसेनेला आपआपल्या प्रभागांमध्ये जे नागरिक नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर केल्यानंतर ‘शंभर टक्के शिवसेना’ नारा यशस्वी करून दाखविता येणार आहे. दरम्यान, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे व शेकापक्ष या पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उभे ठाकल्यास शिवसेना विरोधी मतांची विभागणी होऊन विरोधकांची दमछाक होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील महाआघाडीच्या प्रयोगाला पोलादपूर शहरातील राजकारणी अजिबात धूप घालणार नसल्याने नेते त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांविरोधात टीका कशी करतील, हा अजब प्रयोग पाहण्यास मिळणार आहे.
पोलादपूरच्या उत्तरेकडून प्रभाग रचनेचा निर्देश पाळून ही प्रभागरचना करण्यात आली आहे. प्रभाग 1 मध्ये पार्टेकोंड, सावंतकोंड,रामनगर या लोकवस्तीचा समावेश असून येथून शिवसेनेच्या सुनीता पार्टे या माजी नगराध्यक्षा निवडून आल्या आहेत. हे सर्वसाधारण महिलांसाठीचे हे आरक्षण कायम राहिले आहे.
प्रभाग क्र. 2 मध्ये हनुमाननगर, सावित्रीनगर व आंबेडकर नगर रस्त्याचा पूर्वेकडील भाग येथील लोकवस्ती असून येथून काँग्रेसच्या रेखा सोनावणे तिसऱ्यांदा निवडून आल्या. मात्र, येथे आता सर्वसाधारण पुरूष अथवा महिला उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाला इथे आव्हान निर्माण झाले आहे.
प्रभाग क्र. 3 मध्ये रोहिदासनगर, भैरवनाथनगर उत्तरेकडील भाग व महिला सभागृह उत्तरेकडील भाग या लोकवस्तीत काँग्रेसच्या शुभांगी भुवड या तिरंगी लढतीत विजयी झाल्या. अनुसुचित जाती महिला किंवा पुरूष उमेदवार येथे निवडणूक लढवू शकत असल्याने येथे काँग्रेसला आव्हान निर्माण झाले आहे. प्रभाग क्र. 4 मध्ये भैरवनाथनगर उत्तरेकडील भाग, बाजारपेठ उत्तरेकडील भाग, गणपतीमंदिर ते जयंत विठ्ठल शेठ यांच्या घरापर्यंत व आनंदनगर रस्त्याच्या उत्तर पूर्वेकडील भाग अशी लोकवस्ती असून येथून शिवसेनेचे प्रसन्ना बुटाला तिरंगी लढतीत निवडून आले. मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित जागेमुळे या प्रभागातून शिवसेनेला प्रभावी महिला शोधावी लागणार आहे. प्रभाग क्र. 5 मध्ये प्रभातनगर पूर्व लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या कल्पना सवादकर विजयी झाल्या. मात्र, आता सर्वसाधारण महिला किंवा पुरूष उमेदवारांमुळे येथे स्पर्धा वाढणार आहे. प्रभाग क्र. 6 मध्ये प्रभातनगर पश्चिम व जाखमातानगर या लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष उमेश पवार बिनविरोध विजयी झाले. मागास प्रवर्ग महिला किंवा पुरूष आरक्षणामुळे तसेच उमेश पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथे शिवसेनेसमोर आव्हान उभे राहणार आहे. प्रभाग क्र. 7 गोकूळनगर रस्त्याच्या उत्तरेकडील सैनिकनगर रस्त्याच्या उत्तरेकडील लोकवस्तीमध्ये काँग्रेसचे सुभाष गायकवाड चौरंगी लढतीत विजयी झाले. मागास प्रवर्ग महिला आरक्षणामुळे येथे काँग्रेस पक्षाला आव्हानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्र. 8 सैनिकनगर दक्षिणेकडील आणि साईनाथनगर या लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे विद्यमान उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड हे तिरंगी लढतीत विजयी झाले. मागास प्रवर्ग महिला अथवा पुरूष उमेदवार रिंगणात उभे राहू शकणार असल्याने उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. प्रभाग क्र. 9 मध्ये तांबडभुवन व गणेशनगर लोकवस्तीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी चव्हाण विजयी झाल्या. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे काँग्रेसचा वरचष्मा कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र, येथे भाजपाचाही शिरकाव झाल्याने मतविभागणी अटळ आहे. प्रभाग क्र. 10 मध्ये मठगल्ली व वरचा मोहल्ला लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या संगिता इंगवले या तिरंगी लढतीत विजयी झाल्या. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे येथे शिवसेनेला पुन्हा संधी दिसून येत आहे. प्रभाग क्र. 11 आनंदनगर पूर्व लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या आयुषी पालकर या विजयी झाल्या. शिवसेनेला येथेही सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे संधी दिसून येत आहे. मात्र, उमेदवार निश्चितीसाठी शिवसेनेला निर्णायक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. प्रभाग क्र. 12 मध्ये बाजारपेठ पश्चिमेकडील, शिरिष साबळे ते आनंदनगर रस्त्यापर्यंत मंगल प्रभाकर शेठ यांच्या दुकानापर्यंत व पूर्वेकडील बाजारपेठ, गंगामाता मंदिर ते शंकरमंदिर सिध्देश्वर आळी या लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष सिध्देश शेठ हे तिरंगी लढतीत विजयी झाले. येथे मागास प्रवर्ग महिला आरक्षणामुळे शिवसेनेसमोर महिला उमेदवारांची संख्या वाढण्याची समस्या दिसून येत आहे. प्रभाग क्र. 13 मध्ये शिवाजीनगर बाजारपेठ पूर्वेकडील आणि शिवाजीनगर बाजारपेठ पश्चिमेकडील लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष राजन पवार हे विजयी झाले. सर्वसाधारण महिला किंवा पुरूष आरक्षणामुळे या जागेसाठी शिवसेनेचा वरचष्मा कायम राहणार आहे.  प्रभाग क्र. 14 मध्ये मच्छीमार्केट शिवाजीनगर पूर्व ते कॅप्टन विक्रमराव मोरे हॉलपर्यंत लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक काळ पाणीपुरवठा सभापती असलेले माजी नगराध्यक्ष निलेश सुतार विजयी झाले. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे आता येथे शिवसेनेला अन्य महिला उमेदवार शोधावा लागणार आहे. प्रभाग क्र. 15 शिवाजीनगर प्रभाकर शेठ यांच्या दुकानापासून दिलीप साबळे यांच्या घरापर्यंत ते नाना नानी पार्कपर्यंत या लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या पहिल्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी विजयी झाल्या. सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे त्यांची उमेदवारी कायम राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत. प्रभाग क्र. 16 मध्ये देवळे यांच्या प्लॉटपासून पोलीस वसाहत, मुंबई गोवा हायवेपर्यंत या लोकवस्तीमध्ये शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष नागेश पवार हे दोन वेळा निवडून आले. पहिल्यावेळी विजयी झाल्यानंतर नागेश पवार काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते. सर्वसाधारण महिला किंवा पुरूष आरक्षणामुळे याठिकाणी पुन्हा नागेश पवार यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  प्रभाग क्र. 17 मध्ये गाडीतळ, आदिवासीवाडी आणि लेप्रसी मिशन हॉस्पिटल लोकवस्तीमध्ये शिवसेनेच्या सिद्दीका लोखंडे या विजयी झाल्या. मात्र, सर्वसाधारण महिला किंवा पुरूष जाहिर झाल्याने याठिकाणी शिवसेनेला प्रभाग राखण्यासाठी पुरूष उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
पोलादपूर नगरपंचायतीच्या निर्मितीआधीदेखील ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची बहुमताची सत्ता होती. त्यावेळीची प्रभागरचनादेखील 2011 च्या राष्ट्रीय जनगणनेच्या लोकसंख्या निकषांवर होती. त्यामुळे ग्रामपंचायतीपाठोपाठ नगरपंचायतीमध्येदेखील शिवसेनेचा प्रभाव कायम राहिलेला दिसून आला. त्याच निकषांनुसार या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवेळीदेखील प्रभाग रचना कायम राहिल्याने शिवसेनेलाच यशाचे झुकते माप मिळण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, मागील वेळी नगरपंचायतीतील चंचूप्रवेशापासून वंचित राहिलेल्या भाजप, मनसे, शेकापक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची निवडणूकपूर्व भूमिका कशी ठरते, यावरच आव्हान उभे राहिल अथवा कसे हे दिसून येणार आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close