जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची संवेदनशीलता अन् छत्तीसगडच्या चार वेठबिगार व्यक्तींची झाली सुटका…. वेठबिगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कारवाईचा बडगा….. 

[avatar]

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची संवेदनशीलता अन् छत्तीसगडच्या चार वेठबिगार व्यक्तींची झाली सुटका…. वेठबिगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला कारवाईचा बडगा…..

ठाणे(जिमाका):- जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्याशी छत्तीसगड राज्यातील सुरजपूर जिल्हाधिकारी श्री.रोहित व्यास यांनी संपर्क साधून सुरजपूर येथील श्रीमती राजकुमारी इंद्रपाल सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीस एका ठेकेदाराने मुंबई येथे चार महिन्यापासून डांबून ठेवले असून जबरदस्तीने काम करून घेत आहेत, अशी माहिती दिली आणि संबंधित वेठबिगार व्यक्तींच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. याबाबत अधिक माहिती मिळविण्यात आदिवासी विकास अतिरिक्त आयुक्त श्री.दीपक कुमार मीना यांचेही जिल्हा प्रशासनास मोठे सहकार्य मिळाले.
माहिती प्राप्त होताच या प्रकरणाची अतिशय संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी सर्वप्रथम मुरबाड तहसिलदार संदीप आवारे व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत प्राथमिक माहितीनुसार मुरबाड परिसरात शोध सुरू केला. परंतु शोध लागत नव्हता. पुन्हा अधिक प्रयत्न सुरू केल्यानंतर मोबाईल लोकेशननुसार त्या व्यक्ती पडघा परिसराकडे स्थलांतरित होत असल्याचे लक्षात आले.
थोडाही वेळ न दवडता जिल्हाधिकारी महोदयांनी लागलीच भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसिलदार अभिजीत खोले, पडघा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुंभार यांना याबाबत तातडीने शहानिशा करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी श्री.अमित सानप, भिवंडी तहसिलदार अभिजीत खोले, पडघा पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुंभार व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने प्रत्यक्ष शोध मोहीम सुरू केली. कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने त्या व्यक्तींचा शोध घेणे आव्हानात्मक होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी चंग बांधला होता की, कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर या व्यक्तींची सुटका करायचीच. त्यानुसार महसूल अधिकारी व पोलिसांनी पडघा परिसरात वेगवेगळ्या भागात आपली शोधपथके पाठविली. ज्या ज्या भागात बोअरवेल ची कामे सुरू होती त्यांची माहिती मिळविली. संबंधितांचे फोन लोकेशन पडताळून पाहिले. शेवटी या सर्व प्रयत्नांती नेमकी जागा शोधण्यात यश आले. त्या ठिकाणी इंद्रपाल जगन्नाथ सिंग (वय-30 वर्षे, रा.ग्राम सावारावा, पोस्ट बैजनाथपूर, तहसिल-भैयाथान, जिल्हा-सुरजपूर, राज्य-छत्तीसगड) ही व्यक्ती काम करताना आढळली. त्याची विचारपूस करताना तो व त्याचे इतर साथीदार 1. विकेश उत्तम सिंग,(वय-17 वर्षे, रा.ग्राम सावारावा, पोस्ट बैजनाथपूर, तहसिल-भैयाथान, जिल्हा-सुरजपूर, राज्य- छत्तीसगड.) 2.बादल सोवित सिंग,(वय 14 वर्षे, रा.ग्राम सावारावा, पोस्ट बैजनाथपूर, तहसिल भैयाथान, जिल्हा-सुरजपूर, राज्य-छत्तीसगड) 3. मनबोध धनि राम,(वय-49 वर्षे, रा.ग्राम परसिया, पोस्ट बैजनाथपूर, तहसिल-भैयाथान, जिल्हा-सुरजपूर, राज्य-छत्तीसगड) हे ठेकेदार- मालक कविन मनिवेल यांच्याकडे बोअरवेल व विद्युत अर्थिंग च्या कामासाठी खड्डे खोदण्याचे काम करतात, असे समजले. त्यांनी सांगितले की, मालकाने त्यांना चार महिन्यापासून पगारही दिलेला नाही आणि पगाराचे पैसे मागितले असता पैसे न देता त्यांना शिवीगाळ व मारहाण करून बळजबरीने खड्डे खणण्याचे काम करून घेतले जात आहे. आम्ही आमच्या घरी जातो, असे सांगितल्यानंतरही आम्हाला घरीही जावू न देता आमच्याकडून जबरदस्ती काम करून घेतले जात आहे.
ठेकेदार-मालक कविन मनिवेल, (वय-30 वर्षे गाव पुडुवालावू, पोस्ट किरांम्बूर, ता. परामत्ती, जि. नमक्कल) हे तामिळनाडूचे रहिवासी असल्याची त्याचप्रमाणे मनुष्यबळ पुरविणारा एजंट श्री.शर्मा हा मध्यप्रदेश राज्यातील असल्याची माहिती मिळाली.
ही संपूर्ण बाब वेठबिगार कायद्यांतर्गत कारवाईस पात्र असल्याची खात्री झाल्याने जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांच्या निर्देशाप्रमाणे मंडळ अधिकारी, पडघा यांनी भा.द.वि.स कलम 504 प्रमाणे, वेठबिगार अधिनियम 1976 चे कलम 16,17,18 प्रमाणे बाल कामगार (प्रतिबंध व विनियमन) अधिनियम 1986 चे कलम 14 अन्वये पडघा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून सर्व वेठबिगारांना मुक्त करण्याबाबतची पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
या प्रकरणी पुढील अधिक तपास व आवश्यक कार्यवाही पडघा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुंभार करीत असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या संपूर्ण कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
अशा प्रकारे छत्तीसगड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या चार राज्यांशी संबंधित असलेल्या या यशस्वी कारवाईबाबत जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांचे सुरजपूर जिल्हाधिकारी श्री.व्यास यांनी विशेष आभार मानले. तसेच जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी आदिवासी विकास अतिरिक्त आयुक्त श्री.मीना यांचे आभार मानले तसेच भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, भिवंडी तहसिलदार अभिजीत खोले, पडघा पोलीस निरीक्षक श्री.कुंभार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तर स्वतः जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी माणुसकी प्रति असलेले कर्तव्य पूर्ण केल्याचे समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close