रोह्यातील आधुनिक युगातही अध्यात्माची आस आणि ओढ निर्माण करणारे कवी प्रदीप राजे यांनी लिहिलेला काव्य संग्रह “गाती टाळ मृदंग”…. 

[avatar]

रोह्यातील आधुनिक युगातही अध्यात्माची आस आणि ओढ निर्माण करणारे कवी प्रदीप राजे यांनी लिहिलेला काव्य संग्रह “गाती टाळ मृदंग”….

रोहा (संतोष सातपुते)आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली आहे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून निघालेले वारकरी विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी वारीत सहभागी झालेले आहेत. टाळ मृदूंगाच्या गजरात गळ्यात तुलसी माळा आणि मस्तकी चंदनाचा टिळा लावलेले वारकरी विठुरायाच्या गजर करीत पंढरीच्या दिसशेने निघाले आहेत. अभंगाच्या तालावर रममाण झालेले वारकरी ऊन पाऊस भूक तहान सारे काही विसरलेले आहेत. असं चित्र पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक रस्त्यावर आहे.

आयुष्यात किमान एकदा तरी वारी घडावी असे प्रत्येक विठ्ठल भक्ताला वाटते पण हे भाग्य काही पुण्यवानांच्याच वाट्याला येते. पण विठ्ठलनामाचा हा सोहळा आपण अनेक अभंगातून भक्ती काव्यातून अनुभवू शकतो. संत ज्ञानेश्वर, नामदेव यांच्यापासून चालत आलेल्या या अभंग मंदिराला तुकोबांनी कळस चढविला. त्यानंतरही अनेक कवींनी अभंग रसात विठुरायाचे वर्णन केले आहे. या मांदियाळीत कवी प्रदीप राजे यांचंही नाव आवर्जून घ्यावे लागेल. राजे यांच्या सुंदर भक्ती रचनांचा संग्रह ‘गाती टाळ – मृदंग’ वाचनात आला. अध्यात्माची आवड असलेल्या प्रत्येकाला अभंग, स्तोत्रे, आरती, ओवी या सर्व रचना आपल्याशा वाटतात.अध्यात्म मार्गावर कार्यक्रमण करत असताना विश्वशक्तीशी एकरूप होण्यासाठी पूजा, प्रार्थना, आरती, व्रत, वैकल्य,अभंग गायन ह्या सर्वांचा समावेश होतो.

अध्यात्म म्हणजे काय तर काळ आणि जड विश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म होय! अध्यात्म या शब्दात आद्य+आत्मन् अशी दोन पदे आलेली दिसतात. अध्यात्म म्हणजे आपल्या आत्माचे ध्यान करणे.

अध्यात्म शास्त्रात देवाशी संवाद साधण्याचा पारंपरिक मार्ग म्हणजे अभंग हा काव्य प्रकार! अभंग हे एक अक्षरवृत्त किंवा छंदाचा प्रकार आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, इत्यादी संतांचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे. व्यावहारिक भाषेत सांगायचे तर ज्याचा भंग होऊ शकत नाही तो अभंग! आपली देवावरील भक्ती, निष्ठा कधीही भंग होऊ शकत नाही ही जाणीव अभंग लेखनात, वाचनात आणि पठणात होते.

हेच सिद्ध करणारे ‘ गाती टाळ – मृदंग ‘ हे लेखक कवी प्रदीप राजे लिखित अभंग लेखन हा काव्य प्रकार हाताळलेले पुस्तक हाती आले. मागील काही वर्षे मी हिंदू धर्मातील सर्व स्तोत्रे, सूक्ते, श्लोक शिकवण्याच्या माझ्या संकल्पात जगभरातील अनेकांपर्यंत अध्यात्मातील, धार्मिक साहित्यातील अमूल्य ठेवा पोचवण्यासाठी कार्यरत आहे. योगायोगाने ह्याच धर्तीवर आधारित हा काव्य संग्रह प्रस्तावना लेखनासाठी माझ्या हाती आला आणि वाचकांच्या हाती जाण्याआधी ह्यातील भक्तिरसाने ओतप्रोत भावपूर्ण अभंग वाचनाचा आनंद मिळाला. ह्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणे हा माझ्यासाठी आनंदानुभव होता कारण एकूण 35 अभंग रचना आणि 25 भक्ती काव्य रचनांची रेलचेल ह्या पुस्तकात आहे.
एखाद्या धार्मिक, आस्तिक प्रवृत्तीच्या देवभक्ताला या पुस्तकावर लिहिणे यापेक्षा सुंदर योग दुसरा कोणता असेल!

ह्या संग्रहातील काही ठळक उदाहरणे म्हणजे नेई नाम मार्गा, नामाचा गोंगाट, प्रेमाने उच्चारू, व्यग्र व्यवहारी, भेट गुरू त्यास ….. या आणि अशा प्रत्येक अभंग रचनेत कवीची देवाप्रती असणारी आत्मीयता, ओढ, देव भेटीची आतुरता दिसून येते.

कवी प्रदीप राजे लिहितात,

ऐसा कोणी गुरू l भेटविशी देवा l l
नेई नाम मार्गा l प्रदीपासी l l

अर्थात,
मला माझ्या आयुष्यात कायम अशी माणसे भेटू दे, कायम असे मार्ग दिसू देत ..जे तुझ्याकडे जाणारे असतील!

कधी भजू राम l कधी हरे कृष्ण l
नामाचेच वेड, लागो मना l l

अर्थात,
नावे अनेक असली तरी विश्व शक्तीचे रूप एकच आहे.. मग मला दुसरे तिसरे आयुष्यात काही नको ..तुझा ध्यास ..तुझी ओढ .तुझी आठवण फक्त मनात तेवत असू देत देवा… बाकी सगळी मोहमाया आहे…तू फक्त अंतिम सत्य!

अशी कितीतरी उदाहरणे .. नव्हे प्रत्येकच अभंगाचे उदाहरण देत खरेतर उत्तम प्रवचनमाला करता येईल इतका उत्कृष्ट असा का संग्रह शारदा प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केला आहे.

ह्या संग्रहाच्या दुसऱ्या भागात भक्ती काव्य रचना आहेत ज्यात शेगावच्या गजानन महाराज, कालभैरव देव, देवी कालिका माता, गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ, विठू माऊली या सर्वांवरील भक्ती रस पूर्ण आर्त भावनेच्या रचना आहेत

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मुखपृष्ठकार संदेश सावंत यांनी गोड अशी विठोबा माऊलीची मूर्ती रेखाटली आहे..जी बघूनच मन प्रसन्न होते. याच वर्षी अक्षय मुहूर्तावर हे पुस्तक शारदा प्रकाशन तर्फे प्रकाशित झाले आहे.

तुम्ही धार्मिक, आध्यात्मिक वृत्तीचे असाल किंवा नसाल जरी… तरी….मन प्रसन्न करणारे, मनातील चांगल्या गोष्टींवरील विश्वास दृढ करणारे आणि कोणीतरी ती एक विश्व शक्ती आहे या विश्वात ज्याला आपण हक्काने आपल्या मनातले सारे काही सांगू शकतो, आधार मागू शकतो याची जाणीव करून देणारे हे पुस्तक आपल्या संग्रही नक्की ठेवावे असे आहे.

संत साहित्याची महान परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात विपुल प्रमाणात अभंग रुपी साहित्याची संपदा उपलब्ध आहे. काळानुसार कितीही बदल झाले तरी अभंग हा एक काव्य प्रकार असा आहे ज्यातील शब्द साहित्य, भाव, भक्ती़, परमात्माप्रती प्रेम यात तिळमात्रही बदल होत नाही. असेच हे आजच्या यांत्रिकीकरण आणि
तांत्रिकीकरण झालेल्या आधुनिक युगातही अध्यात्माची आस आणि ओढ निर्माण करणारे कवी प्रदीप राजे लिखित हे पुस्तक आपल्या पुस्तकांच्या कप्प्यात असावे असेच आहे.

हा काव्य संग्रह ऑनलाइन ऑफलाईन सर्व माध्यमात उपलब्ध आहे. न मिळाल्यास अवश्य संपर्क करून आपली प्रत राखून ठेवा.

—————————————-
*गाती टाळ मृदंग*
(अभंग – भक्तीकाव्य )
कवी प्रदीप राजे
प्रकाशक-मुद्रक : शारदा प्रकाशन
स्वागत मुल्य : रु .१२५
संपर्क : डॉ . संतोष राणे
भ्रमणध्वनी : 9820186934
9819023904
________________________

शब्दांकन
प्रा.प्रज्ञा पंडित
लेखिका, कवयित्री, समीक्षक
ठाणे
9320441116

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close