२३ जुलै महाप्रलयाची भयाण काळरात्र ; अंबानदीचा थैमान…पस्तीस वर्षांपूर्वीच्या आठवणीं आजही नागोठणेकरांना ताज्या…… 

[avatar]

२३ जुलै महाप्रलयाची भयाण काळरात्र ; अंबानदीचा थैमान…पस्तीस वर्षांपूर्वीच्या आठवणीं आजही नागोठणेकरांना ताज्या……

 

नागोठणेकरांना एका रात्रीत होत्याचे नव्हते करणारा 23 जुलै 1989 रोजी अंबा नदीने वृद्र आलेल्या महाप्रलयाच्या आठवणीं आज 35 वर्षांनीही ताज्या असून मन हेलाहून टाकणारी ती भयाण काळी रात्र ….

नागोठणेकरांना पुर काही नव्याने सांगायला नको. दर वर्षी पावसाळ्यात तीन-चार वेळा तरी नागोठण्यात पुर येणारच. परंतु 35 वर्षापूर्वीचा 23 जुलै 1989 चा पुर म्हणजे पुर कसला? तो महाकाय महापूरच म्हणायचा. नागोठणेकरांच्या कायम लक्षात राहणार कारण गुण्या-गोविंदाने नांदत असलेला नागोठणे गावाचे एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. जणू काय आमची आंबा नदी आमच्यावर कोपली आहे.

पावसाळ्यात दरवर्षी नागोठणे गावात तीन-चार वेळा पुर येतोच. पुराचे पाणी नदीकिनारी असणारे एस.टी.स्थानक, कोळीवाडा, मच्छीमार्केट फार फार तर बाजारपेठेत घुसत असत. माझे घर नदीपासून फार लांब आहे व उंच ठिकाणावर आहे. तरीही आम्ही सर्व मित्र-मंडळी पुर आला की, पूराच्या पाण्यात होडीत बसून फेरफटका मारणे, पाण्यात मस्ती करणे तसेच पूरग्रस्तांना त्यांच्या घरातून बाहेर काढणे, त्यांचे सामान सुरक्षित ठिकाणी ठेवणे, बाजारपेठेतील दुकानातील सामान इतर ठिकाणी हलवणे तसेच पाण्यातील मज्जाही करीत असतो. असाच कुणाच्याही ध्यानी-मनी नसणारा व आता सांगून खरंही न वाटणारा महाप्रलय नागोठणे गावात आला. तो दिवस होता रविवार दि. 23 जुलै 1989 ची काळी भयाण रात्र. रविवार म्हणजे बाजाराचा दिवस. या दिवशी नागोठणे गावाच्या परिसरातील आदिवासीवाड्या व खेडेगावातून लोक किराणा सामान, कांदे-बटाटे व भाजी-पाला तसेच मटण-मच्छी घेण्यासाठी नागोठणे गावात येत असत. त्यामुळे व्यापारी मंडळी आपल्या दुकानात भरपूर प्रमाणात माल भरून ठेवत. त्यात पावसाळा म्हणजे जरा जास्तच माल. त्या रात्री बाजारपेठेतील तसेच बस स्थानकाशेजारील लहान-मोठे टपरीवाले आपला उद्योग-धंदा करून रात्री झोपीही गेले. परंतु पावसाने आपला रुद्र अवतार धारण केला होता. जाणकारांनी नदी किनारी जाऊन नदीतील पाण्याचा अंदाज घेतला व पुर येण्याची लक्षण काही दिसत नसल्याचे सांगितले. थंडगार वा-याच्या झोतात नागोठणेकर मंडळी गाढ झोपी गेली. रात्री साधारण एक-दोनच्या सुमारास नदी किनारची कोळी बांधव पुर आलाऽऽऽ पुर आलाऽऽऽ …म्हणून ओरडत आली. त्यांच्या पाठोपाठ बाजारपेठ, खालचीआळीतील लोकही आपल्या बायका मुलांना घेऊन आली. आमचे घर नदीपासून जरा लांबच आहे. आम्ही व शेजारील लोकांनी या लोकांना धीर दिला व नेहमीप्रमाणे घरात घेतले. साधारण आणखी दोन तासांनी आमच्याही घराच्या पायरीला पाणी लागले व ते जोरात वाढू लागले जेव्हा पाणी घरात शिरून आमच्या कंबरेपर्यंत लागले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले की, एवढे पाणी आले कुठून? घरात पाणी जोरात वाढू लागल्याने लोकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते म्हणून आम्ही तरुणांनी दोर बांधून घरातील व आजू-बाजूच्या लोकांना पाण्याबाहेर काढले आणी शंकर व ग्रामदैवत जोगेश्वरी मंदिरामध्ये सुरक्षित ठेवले व आम्ही इतरांना मदत करण्यासाठी बाहेर पडलो. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला व जोरात मोठा आवाज झाला. काळोखात काही दिसत नव्हते कारण वीज तर केव्हाच गूल झाली होती. जरा अंदाज घेतल्यावर समजले की, आमच्या शेजारचे दिवेकर यांचे घर पत्यासारखे कोसळले व सर्व सामान आमच्या समोर वाहत जात होते; परंतु आम्ही काहीही करू शकत नव्हतो; कारण पाण्याच्या लाटा म्हणजे महासमुद्राच्या लाटा वाटत होत्या. गावात साधारण पंधरा ते वीस फुट पाणी शिरुन कोळीवाडा, बाजारपेठ, खालचीआळी, बंगलेआळी, खडकआळी, गुरवआळी, दोन्ही मोहल्ले, सरकारी दवाखाना तसेच कचेरी शाळेचा परिसर अशाप्रकारे या महापुराने गावाचा 80% परिसर पाण्याखाली घेतला. उरल्या त्या गवळआळी,कुंभारआळी, मराठाआळी व आंगरआळी. यांचाच आधार शेवटी पूरग्रस्त नागरिकांनी घेतला. पुराचे पाणी काही केल्या कमी होत नव्हते. 24 तारखेच्या संध्याकाळनंतर पाणी हळू हळू कमी होऊ लागलं. 25 तारखेला सकाळी गावात गेलो तर सर्वत्र चिखलच चिखल त्यामध्ये वीजेचे पोल पडले होते, काही घरे, झाडे पडली होती, मोटर सायकली वाहून गेल्या, लहान लहान टप-या तर कुठे गायब झाल्या समजलेच नाही. बहुतेकांचे संसार वाहून गेले होते. आमच्या घरात तर दोन-तीन फुट चिखलामध्ये भांडी, टि.व्ही., टेपरेकॉर्डर, वह्या-पुस्तके इकडे-तिकडे पडली होती; पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेले गहू, तांदूळ, कडधान्य भरलेली पिंप पाण्यात भिजली होती; सर्वत्र रॉकेलचा वास येत होता. पण काय करणार…..निसर्गापुढे आपण काहीही करू शकत नाही, अशी मनाची समजूत घालून मी इतरांच्या दु:खात सहभागी झालो. यातच दोन दिवस निघून गेले. त्यानंतर प्रत्येकजण आपापली घरे साफ करू लागले. गावात संध्याकाळी पाच नंतर कोणी फिरकत नव्हते; कारण गाव भकास दिसत होते. त्यात वीज नाही. उनाड कुत्री भुंकत (रडत) होती. साप सर्वत्र फिरत होते. गावातील 70% लोक गाव सोडून गेली होती. जवळ पैसे असूनही काहीही मिळत नव्हते. बाजारपेठ व घरांमधील धान्य कुजल्याचा वास येत होता. त्यातच पेठेतील एका व्यापा-याचे गोडाऊन साफ करताना दोन कामगारांचा मुत्यू झाला. झालं!! गावात कॉलराची साथ आली, अशी अफवा पसरली. भितीने लोक गावाबाहेर पळू लागली. ही अफवा तसेच संपूर्ण गाव वाहून गेल्याची व तेथे कोणीही रहात नसल्याची बातमी टि.व्ही,रेडियोवर वारंवार सांगू लागले. त्यामुळे नातेवाईक काळजीत पडले. पोलीसही कोणालाच गावात सोडत नव्हते. गावात कोणतेही वाहन येत नव्हते. कारण गावातील सर्व रस्ते पुराने वाहून गेले होते. रोहा भिसेखिंडीत झाडे पडली होती, पेण व पाली रस्ता वाहून गेला, वाकण गावाजवळील पूलाच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेला होता. त्यामध्ये दहा-बारा लहान मोठी वाहने वाहून गेली होती. त्यात मोठी जिवितहानी झाली होती.

पेण रस्ता साफ केल्यानंतर बाहेर गावावरून मदत येऊ लागली. त्यामध्ये धान्य, कपडे, भांडी, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या, औषधे येऊ लागली. इतर गावातील लोक गाव साफ करायला आली. त्यात आर.एस.एस.च्या स्वयंसेवकांचा सहभाग मोठा होता. नातेवाईकसुद्धा येत होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे,जिल्हा परिषद अध्यक्ष, डॉक्टरांचे पथक तसेच सरकारी आधिकारी यांसारख्या मान्यवरांनी गावात भेटी देऊन आस्थेने चौकशी करून धीर दिला.

या महापुराचा फटका नागोठण्यासह रोहा,वाकण,पाली,पेण यांसारख्या शहरांसह असंख्य खेडेगावांना बसलाच; परंतु जांभूळपाडयामध्ये आलेल्या महापुरात वित्तहानीसह जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. एवढा मोठा महापूर नागोठण्याला आला व त्यामध्ये तिवारी कुटुंबियांमधील सर्वच्या सर्व चार जण घराबाहेर पडू न शकल्याने एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेमध्ये मृत्यूमुखी पडली. तसेच आणखी इतर दोन माणसे अशी सहा माणसे वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण वित्तहानी मोठया प्रमाणात झाली या वित्तहानीने नागोठणे गाव 10 ते 15 वर्ष जवळ-जवळ मागे गेले. निसर्ग जरी कोपला असला तरी या महाप्रलयातून आम्हाला सहीसलामत बाहेर काढून या कठीण प्रसंगाला तोड देण्याचे सामर्थ्य आमची ग्रामदेवता जोगेश्वरी मातेने आम्हाला दिले॰

आजही या महापुराची आठवण आली तरी अंगावर काटा व शहारे उभे राहतात. व 35 वर्षापूर्वीच्या काळरात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या. आजही नागोठणेकर जनता या महाप्रलयातून आम्हाला वाचविणारी ग्रामदेवता जोगेश्वरीमाता तसेच आम्हाला मदतीचा हात देणारे अन्नदाते, मायेने अंगावर ऊबदार कपडे टाकणारे, भांडी-कुंडी पुरविणारे, डॉक्टर पथक, गाव साफ करायला आलेली माणसे, सरकारी यंत्रणा यांचे ऋणी आहे.

श्री.महेंद्र सदानंद माने

नागोठणे

9028595969

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close