समाजाच्या दृष्टीने आणि शासनासाठी वास्तू उपयुक्त ठरेल -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अ‍ॅडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरसाठी 50 लाख रुपयांची देणगी….. 

[avatar]

समाजाच्या दृष्टीने आणि शासनासाठी वास्तू उपयुक्त ठरेल -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अ‍ॅडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरसाठी 50 लाख रुपयांची देणगी…..

पनवेल, नवी मुंबई (प्रतिनिधी) देशातील पहिली अ‍ॅडव्होकेट अकॅडमी महाराष्ट्रात साकारली जात आहे याचा निश्चित आनंद आहे. यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे मनःपूर्वक अभिनंदन! शासनाने या अकॅडमी उभारणीसाठी जागा दिली आहे. समाजाच्या दृष्टीने आणि शासनासाठी ही अकॅडमी उपयुक्त ठरेल यात शंका नाही. अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्ट सुधारित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 28) केले.
बार असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने तळोजा येथे उभारण्यात येणार्‍या अ‍ॅडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नेरूळ येथील डॉ. डी.वाय. पाटील लॉ कॉलेजमध्ये झालेल्या समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
या कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, गोव्याचे महाधिवक्ता देविदास पांगम, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे चेअरमन संग्राम देसाई, माजी चेअरमन तथा विद्यमान सदस्य पारिजात पांडे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या अ‍ॅडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरसाठी 50 लाख रुपयांची देणगी धनादेशाच्या स्वरूपात दिली. याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.
आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, न्यायदानाचे क्षेत्र वेगाने बदलत आहे. या क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. कोविड काळात सुप्रीम कोर्टाच्या पुढाकाराने ऑनलाईन न्यायदानाचे उत्तम कार्य पार पडले. त्यामुळे या क्षेत्रातील पारदर्शकता वृद्धिंगत झाली. नुकतेच उच्च न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले तसेच आज या अ‍ॅडव्होकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्राचेही भूमिपूजन झाले आहे.
या अकॅडमीसाठी शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या क्षेत्रात येणार्‍या नवीन वकिलांसाठी विद्यावेतन देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अकॅडमीच्या माध्यमातून न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल आणि चांगले कायदे बनविण्यासाठी या अकॅडमीची निश्चित मदत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचा आवर्जून उल्लेख केला तसेच मी त्यांना आधीपासून ओळखतो, कारण ते व माझे वडील रा.सु. गवई व हे मित्र राहिलेले आहेत, असे सांगितले.
या समारंभासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान सदस्य पारिजात पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरकारी वकील व रायगड जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष संतोष पवार, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष व रायगड अधिवक्ता परिषदेचे उपाध्यक्ष मनोज भुजबळ, जिल्हा महामंत्री सुनील तेलगे, पनवेल अध्यक्ष राजेंद्र देशमुख आदींनी विशेष मेहनत घेतली.
या वेळी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष एस. प्रभाकरन, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष सुदीप पासबोला, सदस्य आशिष देशमुख, मोतीसिंग मेहता, मिलिंद पाटील, गजानन चव्हाण, मिलिंद थोबडे, वसंत साळुंके, अण्णाराव पाटील,
हर्षद निंबाळकर, सतीश देशमुख, अविनाश भिडे, वसंतराव भोसले, जयंत जयभावे, सुभाष घाटगे, अनिल गोवारदिपे, विठ्ठल कोंडे-देशमुख, विवेकानंद घाटगे, डॉ. उदय वारुंजीकर, आसिफ एस कुरेशी, अविनाश आव्हाड, अहमदखान पठाण, अमोल सावंत, राजेंद्र उमप, पनवेल वकील संघटनेचे सचिव प्रल्हाद खोपकर, भूषण म्हात्रे आदी उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close